(तसा आता निवडणूकांचा आणि त्यांच्या निकालांचा फडशा प्रत्येकाचा पाडून झालाच असेल.....पण "मोठ्या"-मोठ्यांच्या लेखणीने डरकाळ्या फोडून झाल्या की "पामरांनी" लेखणी हाताशी घ्यावी असा संकेत आहे, त्यास अनुसरुन...)
हवा आहेच....आता वेग हवा !!!
गेल्या निवडणूकांच्यावेळी विजयश्री खेचून आणणार्या भाजपच्या दारात यंदा तीच विजयश्री बाकी पक्षांची दारं बंद असल्यामुळे कींवा दार उघडून तिला सामोरे जाणार कोण या गोंधळाच्या व्यग्रतेमुळे स्वतःच गेली खरी, पण नाइलाजास्तव बर्याच मोठ्या रुपात...
एकूणच संसदेत विरोध म्हणजे काय हे कुठल्याच घटक विरोधीपक्षाला शेवटपर्यंत ध्यानातच न आल्याने...विरोधाची राहीलेली हौस एकमेकांचाच विरोध करण्यात यांनी नको त्या वेळी भागवली...त्यामुळेच देशरुपी राजकारणाच्या जलाशयात आपली होडी तरुन जाण्याकरीता सर्व पक्षांनी आपल्या होड्या सरसावल्या असताना, एकमेकांंच्या होडीत त्या बुडवण्यासाठी हेच पक्ष बादली भर-भरुन पाणी ओतत बसल्याने मुळ जलाशयातलेच पाणी आटले आणि त्यात चिखल तयार झाला...त्या चिखलात कमळ वर आले नसते तरच नवल !!!
राज्यांच्या आणि केंद्रांच्या निवडणूक निकालांची तफावत काॅग्रेसच्या कानात पिचक्या भरणारी तर आहेच...पण काॅग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर जनतेचा आजही विश्वास असून काॅग्रेसने आता केंद्रातल्या त्याच त्या चेहर्यांना तिकीटांच्या खिरापती वाटण्यापेक्षा याच स्थानिक नेतृत्वाला वर आणण्याची निकड दर्शविणारा आहे....कारण मोदींच्या तोडीचा नव्हे तर मोदींसारखाच चेहरा आता लागेल...हे या अर्थाने की निवडणूकांची सामाजिक अंगाने चिकीत्सा केली असता सामान्यांचा "देवां"वर विश्वास आजही आहे..पण त्याचवेळी त्यांचा प्रतिनिधी सामान्यही असावा...मोदी हे तसे सामान्यांचे असामान्य देव...कांग्रेसने उभे केले असामान्य, ते आपल्यातले वा आपल्यासारखे नाहीत म्हणून ते अ(सा)मान्य देव....पण त्या देवांनी वडीलांवरुन पुळका येणं, वंशवाद वगैरे सामान्यांसारखी वागवणूक आपणही कसे सामान्य हे सिध्द करायला दाखवली...तसं पाहता वैयक्तीक आयुष्यात सामान्य जनता असा विचार करतेच, पण अश्या सामान्यांच्या हातात देश द्यायचा नसतो...म्हणून आताचा काळ राजकारणातील देवांचा आहेच, फक्त हे देव सामान्यातले असावे पण त्याचवेळी आसामान्यही...म्हणून मोदी.
तरी जगभर उजव्या विचारसरणीची लाट फोफावत असताना हा निकाल धुमारे आणि शहारे दोन्हीही आणणारा ठरला. पण हा विजय उजव्याविचारसरणीचा नव्हे...तर उजव्या नेतृत्वाचा. म्हणून डाव्यांनी माना खाली टाकायचं काम नाही, डाव्यांनी नेतृत्व शोधावं....डाव्यांची विचारसरणी जास्ती विचार आणि प्रचारापुरतीच होती. उजव्यांनी ती त्यांच्या कार्यतून पोहोचवली, देशातल्या डाव्यांना ते फारसे अजूनतरी साधले नाही. हिंदूबहूल राष्र्टमध्येच ज्यावेळी हिंदूविचार थेट मागासलेपणाच लक्षण म्हणुन दखलही न घेता तुडवला जातो..त्याच कोंडल्या श्वासांचा हा परीपाक... हिंदू दहशतवादाचा विंचू ठेचण्याचा आव आणत , हिंदू स्वाभिमानाला बगलेत घेउन हिंदूत्वाच्या व्याखेमध्येच स्वतः स्थान मिळवणं, हे मोदींचे खरे यश...
काही मतदारसंघाच्या निकालावरुन जनतेच्या "प्रज्ञेचा" प्रश्न उभा राहत असला तरी भारतात 'गांधी' हे स्वतःमध्येच क्रियापद नसून तो विचार आहे...त्यामुळेच गांधी नावावरुन काहीच होत नाही तर स्वच्छतेसारख्या कामांना का असेना पण केलेल्या कामांना गांधी नावाचे स्टीकर चिटकवून ते क्रियापद चालवावे लागते , याचा नव्याने साक्षात्कार राजकीय वर्तुळाला झाला.
भाजपने केलेले काम तोंडाने मोठे केले हे खरेच , पण याचा अर्थ त्यांनी काही केलेच नाही, असा नाही. काॅग्रेसची कामांची intensity गेल्या १५ वर्षांत एवढी कमी झाली होती की ती त्यांना सहज पार करता आली...भाजपचा विजय काॅग्रेसनीच मोठा केला ,असे म्हणता येते त्या कारणशतकांपैकी हेही एक...पण भाजपचे काम मुख्यत्वे विदर्भ, पूर्वोत्तर भारत अश्या भागांमध्ये, जे भाग विकासाच्या चांदण्यात आजतागायत कधी न्हाहून निघालेच नव्हते....
शिवाय अन्य पक्षीयांनी ध्यानात घेण्यासारखी बाब ही की जनतेशी कायम एकच प्रकारचं नातं ठेवलं की जनतेला त्याचाही विट येतो, मग ते नातं "ममत्वा"च का असेना!!...त्यामुळेच त्याच ठेवणीतल्या मोदींच्या जातीचे वगैरे मुद्यांचा वरवंटा नकळत आपल्याच पायांवर यांनी फिरवला....या व अन्य राफेल सारख्या जनतेच्या डोक्यावरुन जाणार्या व ज्यांची जनतेला कुठल्याच प्रकारची झळ पोहोचली नाही , अश्या मुद्यांचीच फक्त हवा केली. त्याचवेळी सामान्यांना होरपळून काढणार्या गोरक्षा, फसलेले निश्चलनीकरण, भूमि-अधिग्रहण,पर्यावरणाच्या कामांच्या बाबतीत उदासीनता ,अभिव्यक्ती, उंच पुतळे,रुपयाचे मुल्य, राजन-उर्जित, पेट्रोलचे चढे भाव या मुद्यांवरती मात्र त्यांनी उदासीनतेचे उदक सोडले.....त्यामुळेच या सर्व मुद्यांवरती पडदा पडून शांतता म्हणजे झोप हेच समीकरण मानणारा वर्ग युध्दांवरुन राष्र्टवादाने पेटुन उठला....आणि श्री मोदी न झोपलेला देश गदगदून जागवण्यात यशस्वी झाले.....
तेव्हा आता काॅग्रेसने समर्थांनी सांगितल्याप्रमाणे "नसे राम ते काम सोडून द्यावे", भाजपला आतापर्यंत देशात पसरणं भाग होतंं, आता त्यानी आपली "प्रज्ञा" आवरण्यावर भर द्यावा....काॅग्रेसने रिकाम्या जागा भराव्या, तर भाजपने नको त्या जागा रिकाम्या कराव्या...हिंदुत्वाच्या दहशतवादाला वेसणं घालून, खरं हिंदुत्व पसरवावं, त्यातून संस्कृत, ऐतिसासिक वारसा-मंदीरं यांचं भरीव संवर्धन करावं...शेतकर्यांच्या प्रश्नांचा विचार नव्याने व्हावा...हे सर्वे खासदार विजयाच्या उन्मादातून पायउतार होवून लोकसभेच्या "हिरव्या" खुर्च्यांवर विराजमान होण्याआधी किमान १५ दिवस तरी संसदीय शिष्टाचाराचे व शिक्षणाचे वर्ग भरवावे.
एकूणच ह्या निवडणूका अध्यक्षीय (presrdential) निवडणूकांसम वाटत असल्या तरी मतदानात झालेली वाढ अभिनंदनीय आहे....फक्त आता ही वाढ संख्यात्मक न राहता, गुणात्मक देखील व्हावी....
तेव्हा येत्या काळात निकड असणार आहे ती वेग धरण्याची...हा वेग सरकारच्या कामांनी धरावा, विरोधकांच्या विरोधानी धरावा,संसदेच्या कामानी धरावा, लेखक-पत्रकारांच्या लेखणीने धरावा ,कलाकारांनी धरावा, शिक्षकांनी - विद्यार्थ्यांनी धरावा, अर्थक्षेत्रात दडपणाखाली वावरणार्या रुपयांनी धरावा, विचार करणार्यांच्या विचारांनी धरावा.....कारण काळ वेग धरण्याचा आहे....जगाच्या आवेगाला 'भारत' म्हणून उत्तर देण्यासाठी.....
(रेखाटन pininterest वरुन ...साभार)

अतिशय सापेक्ष आणि प्रखर लेख. खरच देशाला आता वेग धरण्याची गरज आहे. आणि भविष्यात गरज आहे एक भक्कम विरोधी पक्षाची. लेखातील काही गोष्टींशी मी असहमत आहे. तरीही, एकंदर पाहता तुझा लेख जबरदस्त आहे. ब्लॉग च्या शिर्षकप्रमाणेच अगदी सखोल विचार प्रकट होत आहेत या लेखाच्या माध्यमातून !
ReplyDeleteमंथन ,, तुझं लेखन खूपच चिकित्सक, सौंदयपूर्ण, विचार करण्यास भाग पाडणारं,, सखोल असं आहे. तू हे ब्लॉग लिहायला सुरुवात केलास खरंच खूप आनंद झाला. आपल्या राजकारणाच्या स्थिती परिस्थिती चे खूप खोल विश्लेषण केलंस,, यावरून तू एक छान विश्लेषक आहेस हे पटतं,, नावाप्रमाणेच प्रत्येक विषयावर तुझं मंथन खूप वाचनीय आहे,, नेहमी आम्हाला तुझं लेख वाचायला मिळेल हीच अपेक्षा आणि तुला खूप खूप शुभेच्छा💐💐💐☺️
ReplyDeleteसुंदर लेखन
ReplyDelete